- राज्य
- 'शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करा'
'शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करा'
उद्धव ठाकरे यांची मागणी राज्य सरकारकडे मागणी
मुंबई: प्रतिनिधी
अतिवृष्टी आणि पूरस्थिती यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्याची वाताहत झाली असून त्यांना सावरण्यासाठी सरसकट संपूर्ण कर्जमुक्त करा आणि पंजाब सरकारप्रमाणे अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टर मदत करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
आपल्या मराठवाडा दौऱ्यात आलेल्या अनुभवांचे कथन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केले. आता तोंडाशी आलेली पिके वाहून गेली आहे. जमीन खरडून शेतातील माती वाहून गेली आहे. विद्यार्थ्यांची वह्य पुस्तके वाहून गेली आहेत. या आपत्तीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना किमान दोन-तीन वर्षाचा कालावधी लागणार आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी आणि संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. आमच्या सरकारच्या कार्यकाळात जेव्हा अशी आपत्ती आली तेव्हा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही पंचांग घेऊन बसलो नाही, असा टोलाही त्यांनी महायुती सरकारला लगावला.
यापूर्वी शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेली 14 हजार कोटी रुपयांची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. सन 2017 मध्ये कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. ती कर्जमाफी देखील अद्याप झालेली नाही. कर्जमाफी कधी करणार, असे विचारल्यावर मुख्यमंत्री राजकारण करू नका म्हणणार असतील तर हो, आम्ही करणार राजकारण, असेही ठाकरे म्हणाले.