- राज्य
- 'तलवार आणा आणि आमची मुंडकी छाटून...'
'तलवार आणा आणि आमची मुंडकी छाटून...'
विजय वडेट्टीवार यांचा आरक्षणाच्या मुद्द्यावर टोला
मुंबई: प्रतिनिधी
तलवार आणा आणि आमची मुंडकी छाटून टाका. ओबीसी प्रवर्गात असलेल्या तब्बल ३७२ जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाका. मगच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे समाधान होईल, असे जळजळीत विधान काँग्रेसचे गटनेते आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन इतर मागास प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत तर मराठा समाजाचा समावेश कुणबी प्रमाणपत्रांच्या नावाखाली जाऊ नये, या मागणीसाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरण्याचा तयारीत आहे.
या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील आणि ओबीसी नेते यांच्यात सातत्याने वाग्युद्ध सुरू आहे. जरांगे पाटील यांनी काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने मराठा आरक्षणाच्या विरोधात वक्तव्य केली जात असल्याचा आरोप करून त्यांना याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे, तर विजय वडेट्टीवार यांनी त्यावर टोकाची विधाने केली आहेत.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हवे आहे. आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातूनही (ईडब्ल्यूएस)आरक्षण हवे आहे. सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासवर्गातूनही (एसईबीसी) लाभ हवे आहेत. एकाच समाजाला हे सर्व लाभ हवे असतील तर इतर समाजांनी जायचे कुठे, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.
ओबीसी आरक्षण धोक्यात आल्यामुळे 12 ओबीसी तरुणांनी आत्महत्या केली आहे, असा दावा करून वडेट्टीवार म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वातावरणामुळे समाजामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. जरांगे पाटील यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी अशी विधाने करणे योग्य नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.