- राज्य
- '... तरीही दसरा मेळावा होणार शिवतीर्थावरच'
'... तरीही दसरा मेळावा होणार शिवतीर्थावरच'
उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला ठाम निर्धार
मुंबई: प्रतिनिधी
पाऊस, वारा, वादळ काहीही परिस्थिती असली तरी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, असा निर्धार शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
दसऱ्याच्या दिवशी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याने उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा ऑनलाईन आयोजित करावा, असा अनाहूत सल्ला देऊन ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे यांना डिवचले आहे. मात्र, दसरा मेळावा शिवतीर्थावरच घेण्यावर ठाकरे ठाम आहेत.
राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थिती यामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य चिखलात लोटले गेले असताना आम्ही दोन तीन तास पावसात भिजलो आणि चिखलात बसलो तरी काही हरकत नाही, असे सांगत ठाकरे यांनी मेळावा शिवतीर्थावरच होणार हे स्पष्ट केले आहे.
दसरा मेळावा हा शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे ऐकण्यासाठी केवळ शिवसैनिकच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकही लाखोंच्या संख्येने शिवतीर्थावर कानात प्राण आणून उपस्थित असत आणि जाताना प्रेरणा, ऊर्जा आणि कृतिकार्यक्रम घेऊन परत जात असत.