- राज्य
- सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध
महाराष्ट्र काँग्रेस लीगल विभागाचे पुण्यात आंदोलन
पुणे: प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या लीगल विभागातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. हा हल्ला केवळ सरन्यायाधीशांवर नव्हे, तर भारतीय न्यायव्यवस्था आणि संविधानावरच झालेला हल्ला असल्याचे जेष्ठ वकिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हल्लेखोराला त्वरित अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे खजिनदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड. अभय छाजेड यांनी केली.
पुणे रेल्वे स्टेशनजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर हे निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व अॅड. फैय्याज शेख यांनी केले.
या वेळी बोलताना मोहन वाडेकर, शारदा वाडेकर, साहीद अख्तर म्हणाले, “हा हल्ला केवळ सरन्यायाधीशांवर नाही, तर भारतीय संविधान आणि न्यायव्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वांवर आहे. अशा घटना न्यायव्यवस्थेचा गौरव मलिन करणाऱ्या असून, भविष्यात त्या पुनरावृत्ती होऊ नयेत, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”
कॉम्रेड अजित अभ्यंकर म्हणाले, “गुन्हेगारांनी सरन्यायाधीश गवई यांच्यावर केलेला हा हल्ला म्हणजे भारतीय राज्यघटनेवर थेट प्रहार आहे. हल्लेखोरांचे मूळ शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे.”
आंदोलनात अॅड. शेख शाहिद अख्तर, अॅड. माघाडे सर, श्रीकांत अगस्ते, अॅड. अनिल कांकरिया, राहुल ढाले, राजेंद्र काळेबेरे, श्रीकांत पाटील, अतुल गुंड पाटील, रमेश पवळे, नंदलाल धीवार, अॅड विद्या पेळपकर, एडवोकेट नीलिमा वर्तक,अशोक धेंडे, अॅड वायदंडे, राजेंद्र चांदेरे, अॅड. संतोष जाधव, अॅड बाळासाहेब बावणे, ऍड. राजेंद्र चिटणीस, ऍड शाम गलांडे, ऍड प्रज्वल मोरे, अतिक महंमद, आशिष गुंजाळ आदी वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आंदोलनाद्वारे न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याला धक्का पोहोचविणाऱ्या कोणत्याही कृत्याचा ठामपणे विरोध करण्यात येईल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. समाजकंटकांविरोधात सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या घटनेमुळे देशभरातील वकील संघटनांमध्ये तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली असून, सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने देखील या हल्ल्याचा निषेध नोंदविला.