- देश-विदेश
- 'मुंबईला बनवणार जगाचे फायनान्शियल पॉवरहाऊस'
'मुंबईला बनवणार जगाचे फायनान्शियल पॉवरहाऊस'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन
मुंबई: प्रतिनिधी
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला जगाचे फायनान्शियल पॉवर हाऊस बनवणार असल्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. नवी मुंबईतील दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी दोन दिवसाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज विमानतळाच्या पहिल्या टप्प्यासह मुंबई मेट्रो ३, कौशल्य विकास योजना यासह तब्बल 30000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांचे लोकार्पण आणि कार्यारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राज्यपाल , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र कृषी आणि उद्योग क्षेत्रात आघाडीवर असून पर्यटनाच्या क्षेत्रातही महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकावर आणण्याचा आपला प्रयत्न आहे. पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. विशेषतः कॉन्फरन्स टुरिझम आणि मेडिकल टुरिझम याला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वाव आहे, असे मोदी यांनी नमूद केले.
केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार व राज्यातील महायुती सरकार पायाभूत सुविधांच्या उभारणीबाबत कायम सतर्क राहिले आहे. मुंबई कोस्टल रोड आणि अटल सेतूची उभारणी पूर्ण झाली आहे. अटल सेतूचे काम सुरू असताना विरोधकांनी त्याबाबत अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या व टीकाही केली. मात्र, अटल सेतूमुळे रोज 20 हजार वाहन चालकांच्या वेळ आणि इंधनाची बचत होते आहे. पर्यावरण हानी टळते आहे, असा दावा मोदी यांनी केला.
दहा वर्षांपूर्वी मुंबईमध्ये केवळ आठ किलोमीटर मेट्रो मार्ग होता तो आता 80 किलोमीटर पर्यंत पोहोचला आहे. लवकरच मुंबईमध्ये 200 किलोमीटर मेट्रो मार्गाचे जाळे उभारले जाणार आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. रेल्वेच्या आधुनिकीकरणाचा लाभ महाराष्ट्राला आणि मुंबईला होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणी मोठ्या फलाटांचे लोकार्पण करण्यात आले असून त्यामुळे मोठ्या चोवीस डब्यांच्या गाड्या या स्थानकातून येजा करू शकणार आहेत, असे मोदी यांनी सांगितले. तीर्थस्थळांच्या विकासाबाबत आपले सरकार सजग असून दोनशे किलोमीटर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी मार्ग आणि 110 किलोमीटरचा जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी मार्ग यांचे काम पूर्ण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
पायाभूत सुविधांच्या विकासामुळे, वाढत्या दळणवळण साधनांमुळे उद्योग, कृषी अशा क्षेत्रांना लाभ होत आहे. रोजगार निर्मिती आणि महिला सुरक्षा यासाठी देखील हा विकास फायदेशीर आहे. समाजातील वंचित घटकांच्या विकासाला आपल्या सरकारने प्राधान्य दिले आहे. आतापर्यंत चार कोटी गरिबांना पक्के घर देण्यात आले असून आणखी तीन करोड घरे गरिबांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शहरी गरीब आणि मध्यमवर्ग यांचे घराचे स्वप्न देखील पूर्ण करण्यात येणार आहे, अशी ग्वाही मोदी यांनी दिली.
स्वनिधी योजनेअंतर्गत 90 लाख छोट्या व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध करून दिली असून 13 लाख लाभार्थी महाराष्ट्रात आहेत. या कर्जामुळे या उद्योजकांच्या दरमहा कमाईत किमान दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. अशा छोट्या व्यावसायिकांकडून तब्बल सव्वातीन लाख कोटी रुपयांची इलेक्ट्रॉनिक देवाण-घेवाण झाली आहे. त्यामुळे डिजिटल इंडियाला देखील हातभार लागला आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
अपप्रचार करणाऱ्यांना चपराक
राज्यातील महायुती सरकारने कौशल्य विकास योजनेअंतर्गत दरवर्षी १० लाख युवकांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला असून त्यामुळे रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. भारतीय रिझर्व बँकेने नुकत्याच सादर केलेल्या अहवालानुसार देशात मागील तीन-चार वर्षाच्या कालावधी तब्बल आठ कोटी नवे रोजगार उपलब्ध झाले आहेत. युवकांना रोजगार मिळत नसल्याची ओरड करणाऱ्या आणि अफवा पसरणाऱ्यांना ही चपराक आहे, असा टोला मोदी यांनी लगावला. या अफवा पसरवणारे युवकांचे विश्वासघातकी, रोजगार आणि गुंतवणूक रोखणारे विकासविरोधी आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.