- राज्य
- कैद्यांवर धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणि आमिष
कैद्यांवर धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणि आमिष
वकिलांनी पत्रकार परिषद घेऊन केले आरोप
बीड: प्रतिनिधी
बीड जिल्हा कारागृहात खुद्द कारागृह अधीक्षकांकडूनच कैद्यांना धर्मांतर करण्यासाठी आमिष दाखवले जाते तसेच धमक्या देऊन दबाव देखील आणला जातो, असे आरोप चार कैद्यांचे वकील राहुल आघाव यांनी केला आहे. कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची कारकीर्द वादग्रस्त असूनही कारागृह प्रशासन त्यांना पाठीशी का घालत आहे, असा सवालही आघाव यांनी केला.
विविध कारणांसाठी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या तीन हिंदू आणि एका मुस्लिम कैद्याचे वकीलपत्र आपल्याकडे आहे. कारागृह अधीक्षक गायकवाड हे या कैद्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास गुन्ह्यातून मुक्तता करू, असे आमिष दाखवत आहेत. तसेच पैसा, बंगला, गाडी देण्याची लालूच दाखवत आहेत. त्याचप्रमाणे आपले म्हणणे न ऐकल्यास अन्नात विष घालून मारून टाकण्याची धमकी देखील दिली जात आहे, असे गंभीर आरोप वकील आघाव यांनी गायकवाड यांच्यावर केले आहेत.
सक्तीने धर्मांतर करणे बेकायदेशीर असतानाही खुद्द कारागृह अधीक्षकांकडून असे प्रकार घडत आहेत. याबाबत आपण ई-मेल द्वारे तक्रार दाखल केली असून लवकरच वरिष्ठ कारागृह अधिकाऱ्यांकडे लिखित स्वरूपात तक्रार दाखल करणार आहोत. त्याचप्रमाणे गायकवाड यांच्या विरोधात न्यायालयात देखील दाद मागितली जाणार आहे, असे आघाव यांनी स्पष्ट केले.
कालच आमदार गोपीचंद पडळकर यांनी गायकवाड यांच्यावर धर्मांतर करत असल्याचे आरोप करून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे अशी मागणी केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वकील आघाव यांनी गायकवाड यांच्यावर तेच आरोप केले आहेत. गायकवाड हे जळगाव कारागृहात कार्यरत असताना त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्यावेळी त्यांना निलंबित देखील करण्यात आले होते. त्यांच्या बीड येथील कारकिर्दीत कैद्यांकडे मोबाईल फोन आणि गांजा सापडल्याबद्दल चार गुन्हे दाखल आहेत. अशी वादग्रस्त कारकीर्द असलेल्या अधिकाऱ्यावर कारागृह प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आघाव यांनी केली आहे.