- राज्य
- 'भाजपला राज्य चालवता येत नाही'
'भाजपला राज्य चालवता येत नाही'
उद्धव ठाकरे यांची केंद्र व राज्य सरकारवर टीका
पुणे: प्रतिनिधी
भारत हा जगातील खूप चांगला देश आहे. मात्र,सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने त्याचा नरक बनविण्याचा चंग बांधला आहे. भाजपला राज्य करता येत नाही हे केंद्रात आणि राज्यातही सिद्ध झाले आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वार्तालाप कार्यक्रमात बोलताना केली.
भाजप देशाला हुकुमशाहीकडे घेऊन जात आहे. समाजात मतांचे राजकारण साधण्यासाठी जाती धर्मांच्या भिंती उभ्या केल्या जात आहेत. केंद्र सरकारला काश्मीर प्रश्न सोडवता आला नाही. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करा आली नाही. लडाखमध्ये हिंसा झाली म्हणून सोनम वांगचुक यांना अटक केली. मात्र, मणिपूर कोणी पेटवले हे सरकारला कळते का, असे अनेक सवाल ठाकरे यांनी उपस्थित केले.
देवेंद्र फडणवीस हे हतबल मुख्यमंत्री
राज्यात महायुतीला पाशवी बहुमत मिळाले आहे. केंद्र सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. तरीही फडणवीस हे हातबल मुख्यमंत्री आहेत. ही हतबलता कशामुळे निर्माण झाली आहे याची आपल्याला माहिती नाही, अशी टीकाही ठाकरे यांनी केली. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सर्रास भ्रष्टाचार सुरू आहे. वेगवेगळ्या आरोपाखाली शासकीय अधिकारी अटकेत जातात. मात्र, पुरावे देऊन देखील भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करण्याचे धाडस मुख्यमंत्री दाखवू शकत नाहीत. शक्तिपीठ महामार्ग उभारणे आणि शेतकऱ्यांना मदत देणे, याच्यातला प्राधान्यक्रम त्यांना ठरवता येत नाही, अशा शब्दात ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना टीकेचे लक्ष्य केले.
... ही बाब अस्वस्थ करणारी
मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे. त्यांचे संपूर्ण पीक पाण्यात सडून गेले आहे. शेतकऱ्यांना पीक विमा मिळूच नये अशा पद्धतीने त्यासाठी किचकट निकष लावण्यात आलेले आहेत. एवढ्या संकटात असूनही शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, ही बाब अस्वस्थ करणारी आहे. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात आपण कोणी न मागता देखील शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमुक्त केले. करोना महामारीच्या संकटात भरघोस मदत दिली. शिवभोजनसारखी दिलासा देणारी योजना अमलात आणली, असे ठाकरे यांनी सांगितले.
... म्हणजे हिंदुत्व सोडले का?
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाताना शिवसेनेने हिंदुत्व सोडले, या वारंवार केल्या जाणाऱ्या टीकेचा ठाकरे यांनी समाचार घेतला. आम्ही भाजपला सोडले म्हणजे हिंदुत्व सोडले असे होते का, असा सवाल करून ठाकरे म्हणाले की आमचे हिंदुत्व सुधारणावादी हिंदुत्व आहे. आपले आजोबा केशव ठाकरे हे मोठे समाज सुधारक होते. उलट भाजपचा कामाच्या नावाने नन्नाचा पाढा असल्यामुळे त्यांच्याकडून हिंदू मुसलमान सारख्या भावनिक मुद्द्यांना पुढे केले जाते. पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी नावे विचारून हिंदूंची हत्या केली. याचा अर्थ यांच्या राज्यातच हिंदू असुरक्षित आहेत, असा टोला ठाकरे यांनी लगावला.
'सौगात ए मोदी' कोण वाटत फिरते?
दुसरीकडे भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मशिदीत जातात. भाजप आवर्जून अल्पसंख्या सभासद करून घेतो. दहशतवादी पाठवून हिंदूंची हत्या करणाऱ्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळतो. इतकेच नव्हे तर सौगात ए मोदी वाटत कोण फिरतो? यापूर्वी कधी सौगात ए नेहरू, सौगात ए गांधी, असले प्रकार तुम्ही कधी ऐकले आहेत काय, असा सवाल ठाकरे यांनी केला.
योग्य वेळी करणार युतीची घोषणा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि आपण सन 2005 पासून वेगळे झालो. त्यानंतर मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो. पुढे एकत्र राहण्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत. त्यानंतरही तीन वेळा आमची भेट झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे योग्य वेळी मनसे बरोबर युती करण्याचा निर्णय जाहीर केला जाईल, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली. आम्ही एकत्र येणार असल्यामुळे मराठी मतांची एकजूट होणार आहे. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. म्हणूनच त्यांच्याकडून आमच्या एकत्र येण्याबद्दल अपप्रचार केला जात आहे, असा आरोपही ठाकरे यांनी केला.
... तर लोकांनी बघावे कोणाकडे?
ज्यांना आम्ही भरभरून दिले, त्यांनीच आमच्या पाठीवर वार केला. त्यांनी माझा पक्ष चोरला, चिन्ह थोरले आणि वडीलही चोरले. या देशात पक्षांतर बंदी कायदा आहे कशासाठी? आम्हाला निवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, त्यांचे सारेच वास्तव आता उघड झाले आहे. जर न्यायालयाकडून जनतेला न्याय मिळणार नसेल तर लोकांनी बघावे कुणाकडे? लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर राग का निर्माण होतो, ते रस्त्यावर का उतरतात, याचा विचार केला जाणार आहे की नाही, असेही ठाकरे म्हणाले.
भेदभाव दूर करणे गरजेचे
आपल्याकडचे साखर सम्राट भाजपमध्ये गेले की त्यांना थकहमी मिळते. त्यांच्या कारखान्यांना शेकडो कोटींची कर्ज मिळतात. त्यांनी कर्जाची परतफेड केली नाही तर सरकार ती करते. मात्र, शेतकरी बँकेत कर्ज मागायला गेला तर त्याला शेतजमीन, बैल जोडी एवढेच काय पण घरातील स्त्री धनही गहाण ठेवावे लागते. हा भेदभाव दूर करणे गरजेचे आहे, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.
हा खरोखरचा विकास आहे का?
आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होताना थोडे थांबून सिंहावर लोकन करण्याची गरज आहे. आपण ज्याला विकास म्हणतो तो खरच विकास आहे का, याचा विचार प्रत्येकाने करण्याची वेळ आली आहे. आज आपल्यावर कोसळणारी नैसर्गिक आपत्ती ही त्याच तथाकथित विकासाची फळे आहेत का, हे तपासणी गरजेचे आहे. आज विकासाच्या नावाखाली प्रत्येक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर घरे बांधण्यात आली. मात्र, एवढ्या लोकसंख्येला पुरतील इतक्या सुविधा देणे शक्य आहे का याचा विचार झाला नाही. विकासाच्या नावाखाली झालेल्या पर्यावरणाच्या हानीचा विचार झाला नाही. आता प्राधान्याने हा विचार करण्याची वेळ आली आहे, याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले.
शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या टिकेबाबत आपण काहीही प्रतिक्रिया देणार नाही. गद्दारांना उत्तर देण्याची गरज आपल्याला वाटत नाही, असेही ते म्हणाले.