- राज्य
- 'आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी आखणार व्यापक धोरण'
'आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी आखणार व्यापक धोरण'
एक आठवड्यात महत्वपूर्ण घोषणा करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबई: प्रतिनिधी
अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानाची सविस्तर माहिती जमा करण्याचे काम सुरू असून बाधित आपत्तीग्रस्तांना मदत देण्यासाठी व्यापक धोरण आखण्याचे काम सुरू असून त्या सदर्भात एक आठवड्यात महत्वपूर्ण घोषणा केली जाईल, अशी काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली.
नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याबाबत एक आठवड्यात सर्वसमावेशक धोरण आखले जाईल आणि दिवाळीपूर्वी संबंधितांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होईल, या दोषीने सरकारचे प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
शासकीय दप्तरात ओला दुष्काळ असा उल्लेख नाही
सध्याच्या अतिवृष्टी आणि महापुराच्या काळात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. ओला दुष्काळ जाहीर न केल्याबद्दल सरकारवर टीका देखील केली जात आहे. मात्र, शासकीय दप्तरात, मॅन्युअल मध्ये ओला दुष्काळ ही संकल्पनाच अस्तित्वात नसल्याची बाब मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे. दुष्काळ जाहीर केल्यानंतर ज्या सवलती देण्यात येतात आणि ज्या उपाययोजना केल्या जातात त्याच सध्याच्या काळातही लागू केलेल्या आहेत, असा दावा देखील मुख्यमंत्र्यांनी केला.
कर्करोग सेवा धोरण
कर्करोगाच्या रुग्णांना उपचार उपलब्ध व्हावे यासाठी राज्य सरकार कर्करोग सेवा धोरण राबवणार असून त्यासाठीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती ही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. सध्या अनेक ठिकाणी कर्करोगावरील उपचार उपलब्ध असले तरी देखील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कर्करोगावरील उपचाराची यंत्रणा उपलब्ध व्हावी या दृष्टीने हे धोरण आखले गेल्याचे त्यांनी सांगितले.