- राज्य
- 'दिल्लीचे जोडे उचलणारा होणार नाही मुंबईच्या महापौर'
'दिल्लीचे जोडे उचलणारा होणार नाही मुंबईच्या महापौर'
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे प्रतिपादन
मुंबई: प्रतिनिधी
दिल्लीचे पाय धुणारा नव्हे तर अस्सल भगव्या रक्ताचा मराठी बाण्याचा माणूसच मुंबईचा महापौर होईल, अशी ग्वाही शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. काल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीत मुंबईसह अन्य महापालिका निवडणुकीबाबत चर्चा झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. विरोधकांनी काहीही वावड्या उठवल्या तरी त्यांच्या छाताडावर पाय रोवून आम्ही एकत्र येणारच. राज आणि उद्धव यांच्यातील नियमित संवादामुळे त्यांच्या व्यक्तिगत आणि राजकीय संबंधात मजबुती आली आहे. महाराष्ट्रात 27 महानगरपालिका आहेत. सर्व महापालिकांमधील सर्व जागांवर सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. कोण कोणाला कुठे सामावून घेऊ शकतो, याचा विचार होणे गरजेचे आहे. स्थानिक पातळीवरील प्रमुख नेत्यांच्या चर्चा अंतिम टप्प्यात आले आहेत, असे राऊत यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचे अस्तित्व आजही कायम आहे. काल झालेल्या कौटुंबिक सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील सहभागी झाल्या होत्या. आघाडीचे कार्य, भूमिका आणि महत्त्व कायम आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक, पुणे या महापालिकांच्या निवडणुकांबाबतही गांभीर्याने चर्चा सुरू आहे, असेही ते म्हणाले.