- राज्य
- 'मोजावी लागेल या विटंबनेची किंमत... '
'मोजावी लागेल या विटंबनेची किंमत... '
संजय राऊत यांचा रामदास कदम यांना इशारा
मुंबई: प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्याच्या उद्देशाने शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची यांच्या मृत्यूनंतर जी विटंबना चालवली आहे त्याची किंमत त्यांना मोजावीच लागेल, असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
रामदास कदम यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्यावर काही आरोप केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात अस्वस्थता पसरली आहे. केवळ टाळ्या मिळवण्यासाठी रामदास कदम खुद्द बाळासाहेब ठाकरे यांची विटंबना करीत आहेत. त्याची जबर किंमत त्यांना मोजावी लागेल, असे राऊत म्हणाले.
रामदास कदम आणि डॉ नीलम गोऱ्हे यांना विधान परिषदेवर पाठवण्यास शिवसेनेतूनच मोठ्या प्रमाणावर विरोध होता. डॉ गोऱ्हे यांचे पक्षासाठी योगदान काय, असा सवाल केला जात होता तर रामदास कदम यांना दीर्घकाळ आमदारकी आणि मंत्रीपद दिले असतानाही परत त्यांनाच विधान परिषदेवर का पाठवायचे, असा प्रश्नही केला गेला. मात्र, उद्धव ठाकरे दयाळू असल्यामुळे त्यांनी दोन वेळा रामदास कदम यांना विधान परिषदेत संधी दिली. त्यामुळे वास्तविक कदम यांनी ठाकरे यांच्याशी कृतज्ञ राहणे गरजेचे होते, असे राऊत म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या अखेरच्या काळाबद्दल कदम विधाने करीत आहेत. त्या काळात मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो. त्यामुळे तिथे नेमके काय घडले याची मला पूर्ण कल्पना आहे. रामदास कदम आणि इतर मंडळी त्यावेळी तिथे उपस्थित नव्हते. पद आणि पैसा मिळवण्यासाठी माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो हे रामदास कदम यांनी आपल्या बेपर्वा विधानांमुळे दाखवून दिले आहे. त्यांनी टाळ्या मिळवण्यासाठी ही विधाने केली. मात्र, त्यांना टाळ्या तर मिळाल्या नाहीतच. उलट महाराष्ट्र त्यांच्यावर थुंकत आहे, असेही राऊत म्हणाले.