- राज्य
- '... तर उबाठाचा दसरा मेळावा हा काँग्रेसच्या कावळ्यांचा'
'... तर उबाठाचा दसरा मेळावा हा काँग्रेसच्या कावळ्यांचा'
शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांची बोचरी टीका
मुंबई: प्रतिनिधी
दसरा मेळावा हा शिवसैनिकांसाठी पंढरीच्या वारी प्रमाणे आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही खरी शिवसेना आहे. आमचा दसरा मेळावा हा मावळ्यांचा आहे तर उबाठाचा दसरा मेळावा काँग्रेसच्या कावळ्यांचा आहे. त्यांनी दिल्लीला जाऊन सोनिया गांधी यांच्या अंगणात मेळावा साजरा करावा, अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी शिवसेना ठाकरे गटावर बोचरी टीका केली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचे वारस अनेक असतील. मात्र, त्यांच्या विचाराचे वारस एकनाथ शिंदे हेच आहेत, असा. दावा वाघमारे यांनी केला. पूर्वी दसरा मेळाव्यात विचार मांडले जात असत. मात्र, उबाठाच्या दसरा मेळाव्यात पी जे मारले जातात, अशी टीकाही त्यांनी केली.
मुंबईचा महापौर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा होईल, असा दावा त्या पक्षाचे नेते करतात त्यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काही का बोलत नाहीत, असा सवाल करतानाच वाघमारे म्हणाल्या की, दोन भाऊ एकत्र येत आहेत ही चांगलीच गोष्ट आहे. मात्र, उद्धव आणि राज ठाकरे हे दोन भाऊ वेगळे का झाले, याबद्दल राऊत यांनी बोलावे.
संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षाचा मेळावा दिल्ली येथे घ्यावा. त्यांची हाय कमांड दिल्लीत आहे. त्यांच्याकडे एका विमानात बसतील एवढेच लोक शिल्लक आहेत. त्यामुळे त्यांनी सोनियांच्या अंगणात मेळावा घ्यावा, अशी उपहासात्मक टीका वाघमारे यांनी केली. त्यांच्या मेळाव्यात उद्या दाऊद इब्राहिमला देखील बोलवतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
पूरग्रस्त भागाच्या दौऱ्याचे अनुभव देखील वाघमारे यांनी कथन केले. पूरग्रस्त भागात परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आपल्या दौऱ्याच्या वेळी महिला अक्षरशः गळ्यात पडून रडल्या, असे त्यांनी सांगितले. संकटात असलेल्या या भागात काही बँका कर्जदारांच्या मागे वसुलीचे तगादे लावत आहेत. ही बाब अत्यंत अमानुष आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कानावर ही बाब घालून सुलतानी वसुली थांबवली जाईल, अशी ग्वाही देखील वाघमारे यांनी दिली.