- राज्य
- न्यायव्यवस्थेविषयी चाड असल्यास धर्मांध वकिलावर करा कठोर कारवाई
न्यायव्यवस्थेविषयी चाड असल्यास धर्मांध वकिलावर करा कठोर कारवाई
काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांची केंद्र सरकारकडे मागणी
पुणे: प्रतिनिधी
सनातन धर्माच्या नावाखाली जातीय-धर्मांधतेने आंधळी झालेली व्यक्ती सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा निंदनीय प्रयत्न करते तेंव्हा पंतप्रधानांनी केवळ समाज माध्यमांवर पोस्ट न करता कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली आहे.
आपल्या कृतीने केवळ सरन्यायाधीशांचाच नव्हे तर भारतीय न्यायव्यवस्थेचा अवमान करणाऱ्या विकृत वकिलाला भारतातील राम मंदिर उभारणीत न्यायव्यवस्थेचे योगदानाचा विसर पडला का, असा संतप्त सवाल तिवारी यांनी केला.
तब्बल ४५० वर्ष प्रलंबित ‘राम मंदीर - बाबरी मशीद’ वाद न्यायव्यवस्थेच्या पुढाकारानेच शांततेने व कायदेशीर तोडग्याने सुटू शकला, हा स्वतंत्र भारताच्या लोकशाहीचा गुण आहे. मात्र, ‘सनातन धर्मा’चा ढोल पिटणाऱ्या व विकृतीने ग्रासलेल्या प्रवृत्तीला हे दिसू नये वा समजू नये हे सखेद आश्चर्य आहे, असे तिवारी यांनी नमूद केले.
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा निंदनीय प्रयत्न हा न्यायव्यवस्थेवर हल्ला असून पंतप्रधानांनी केवळ ट्वीट व फोनद्वारे निषेध करून थांबू नये. न्यायव्यवस्थेवर जातीय व धर्मांधतेचे जाणीवपूर्वक दडपण आणणाऱ्या राकेश किशोरवर ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करून न्यायव्यवस्थेविषयी आदर व सन्मान कृतीने सिद्ध करावा, अशी मागणी तिवारी यांनी केली.