- राज्य
- शिंदे गटाशी युती करण्याच्या प्रस्तावाबाबत ठाकरे यांची तीव्र नाराजी
शिंदे गटाशी युती करण्याच्या प्रस्तावाबाबत ठाकरे यांची तीव्र नाराजी
सिंधुदुर्ग दोन्ही गटांनी युती करण्याचा स्थानिकांचा प्रस्ताव
मुंबई: प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सिंधुदुर्गात शिवसेना शिंदे गटाशी युती करण्याच्या शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांच्या प्रस्तावाबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इतर कोणाशीही युती करू पण शिंदे गटाशी युती करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका असताना देखील असा प्रस्ताव कसा मांडण्यात आला, असा सवाल ठाकरे यांनी केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणुकीत, विशेषतः कणकवली नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाशी युती करण्याचा निर्णय जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतला होता. त्या संदर्भात कणकवली येथे एक गुप्त बैठक पार पडली. या प्रस्तावा बाबत माहिती देण्यासाठी संदेश पारकर, वैभव नाईक यांच्यासह स्थानिक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र, ठाकरे यांनी या प्रस्तावा बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी केवळ शिवसेनेचे दोन गटच नव्हे तर सर्व पक्षांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे स्थानिक नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांना सांगण्यात आले. शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकत्र येऊन निवडणूक लढवणे किती महत्त्वाचे आहे, याचे वर्णनही स्थानिक नेत्यांकडून करण्यात आले. या संभाव्य युती बाबत केवळ अन्य राजकीय पक्षच नव्हे तर अनेक स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते देखील आग्रही असल्याचे ठाकरे यांना सांगण्यात आले. याबाबत ठाकरे यांनी कोणतेही स्पष्ट आदेश न देता या प्रस्तावा बाबत नाराजी मात्र व्यक्त केली.

