- राज्य
- डबेवाल्यांनी केला ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र'
डबेवाल्यांनी केला ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साथ देण्याचा निर्णय
मुंबई: प्रतिनिधी
शिवसेनेचा हक्काचा मतदार असलेल्या डबेवाल्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. डबेवाला संघटनेचे प्रमुख सुभाष तळेकर यांनी समस्त डबेवाल्यांच्या वतीने हा निर्णय जाहीर केला आहे.
डबेवाला संघटनेने सुरुवातीपासून शिवसेनेला प्रामाणिकपणे साथ दिली आहे. सन 2017 च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे डबेवाल्यांसाठी अनेक आश्वासने दिली. मुंबई महापालिकेचे सत्ता दीर्घकाळ शिवसेनेच्या हातात होती. उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर होते. मात्र, त्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही, असे तळेकर यांनी सांगितले.
डबेवाल्यांची कंपनी स्थापन केली जाईल. त्या कंपनीला 5 कोटी रुपये भाग भांडवल दिले जाईल आणि त्या माध्यमातून डबेवाल्यांसाठी कामे केली जातील. डबेवाल्यांच्या मुलांच्या आरोग्यासाठी योजना राबवल्या जातील. डबेवाल्यांसाठी स्टेशनच्या बाहेर सायकल स्टँड उभे केले जातील अशा विविध घोषणा केल्या होत्या. पण त्या पूर्ण केल्या नाहीत, अशी टीका सुभाष तळेकर यांनी केली आहे.
शिवसेनेच्या स्थापनेपासून मुंबईतील कोळी समाज, डबेवाले आणि मराठी माणूस शिवसेनेच्या पाठीशी राहिलेला आहे. मात्र, सत्ता नसतानाही शिवसेनेची साथ देणाऱ्या डबेवाल्यांनी सत्ता उपभोग झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याचा आरोप करेल शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाला या निर्णयाचा फटका बसणार हे निश्चित.आहे.

