- राज्य
- नवले पुलावर नागरिकांनी घातला प्रशासनाचा दशक्रिया विधी
नवले पुलावर नागरिकांनी घातला प्रशासनाचा दशक्रिया विधी
वारंवार होणाऱ्या अपघातांबद्दल प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन
पुणे: प्रतिनिधी
नवले पुलावर वारंवार अपघात होत असूनही त्यावर उपाययोजना करण्याबाबत प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप करून स्थानिक नागरिकांनी नुकत्याच घडलेल्या अपघाताच्या जागीच प्रशासनाचा प्रतिक्रियात्मक दशक्रिया विधी केला.
एका भरधाव कंटेनरने नवले पुलावर अनेक वाहनांना धडक देण्याचा प्रकार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी घडला. यावेळी त्या कंटेनर ने पेटही घेतला. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले.
हा अपघात नेमका कसा घडला याबाबतचा सविस्तर अहवाल प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओकडून तयार केला जात आहे. कंटेनर अतिवेगात असल्यामुळेच चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आरटीओने काढला आहे.
नवले पुलावर आत्तापर्यंत अनेक गंभीर अपघात झाले आहेत. त्याबाबत काही उपाययोजना करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र, त्यानंतरही अपघातांचे सत्र थांबलेले नाही. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि नियमित प्रवासी यांच्यामध्ये प्रशासना बाबत संतापाची भावना आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतीच नवले पुलाला भेट देऊन पहाणी केली आहे.

