- राज्य
- विद्यार्थ्यांच्या समयसूचकतेमुळे बिबट्याने ठोकली धूम
विद्यार्थ्यांच्या समयसूचकतेमुळे बिबट्याने ठोकली धूम
दप्तराने वाचवला विद्यार्थ्यांचा जीव
पालघर: प्रतिनिधी
जंगलातील पायवाटेवरून शाळेतून घरी निघालेल्या अकरा वर्षाच्या विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला चढवला. मात्र, विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराने त्याचे प्राण वाचवले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे बिबट्यानेच घाबरून जंगलात धूम ठोकली.
विक्रमगड तालुक्यातील पडवीवाडा येथे राहणारा मयंक विष्णू कुवरा हा विद्यार्थी उतावळी आदर्श विद्यालयात शिकत आहे. शाळेत जाण्यासाठी आणि शाळेतून येण्यासाठी जंगलातील पायवाटेवरून या वाड्यातील विद्यार्थ्यांना रोज एकूण आठ किलोमीटर पायपीट करावी लागते.
मयंक हा शाळेतून परतत असताना बिबट्याने त्याच्यावर झडप घेतली. बिबट्याचे पाय मयंकच्या दप्तरावर अडकले. मात्र, त्याच्या दंडाला आणि हाताला बिबट्याची तीक्ष्ण नखे लागल्यामुळे मोठ्या जखमा झाल्या. या हल्ल्याने काही काळ भांबावलेल्या मयंकने तातडीने स्वतःला सावरून जोर जोराने ओरडण्यास सुरुवात केली. त्यामुळे सावध झालेल्या मागून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी बिबट्यावर दगडफेक सुरू केली. या अनपेक्षित प्रतिसादामुळे बिबट्या घाबरला आणि जंगलात पळून गेला.
बिबट्याच्या नखांमुळे मयंकच्या हातावर झालेल्या जखमा भरून येण्यासाठी त्याला विक्रमगडच्या रुग्णालयात दाखल करून अनेक टाके घालण्यात आले आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
विद्यार्थ्यांच्या या धाडसाचे गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे. मात्र, वारंवार बिबट्याचे हल्ले होऊ नयेत यसाठी पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी देखील गावकऱ्यांकडून वनविभागाकडे केली जात आहे.

