- राज्य
- शिवसेना शिंदे गटालाही भाजप नकोसा?
शिवसेना शिंदे गटालाही भाजप नकोसा?
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अनेक ठिकाणी वेगळा निर्णय
मुंबई: प्रतिनिधी
राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सूर जुळत नसल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. भाजपा बरोबर नैसर्गिक युती असल्याचा दावा करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाने या निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपाला दूर ठेवण्याची भूमिका घेतली आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात शिवसेना शिंदे गटासह इतर सर्व पक्ष एकत्र आले आहेत. नंदुरबार नगर परिषदेच्या निवडणुकी संदर्भात शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्यात रात्री उशिरा बैठक झाली. या ठिकाणीही शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजपला दूर ठेवून एकत्र निवडणूक लढवण्याच्या विचारात आहे.
या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत रणनीती निश्चित करण्यासाठी मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी शिंदे गटाचे आमदारांची गुप्त बैठक पार पडली. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती करण्याबाबत भाजपाला औपचारिक रित्या प्रस्ताव देण्यात यावा. भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास स्वबळावर निवडणुका लढवाव्या, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

