- राज्य
- शिंदे गटाच्या मंत्र्यांचा बहिष्कार नव्हता तर...
शिंदे गटाच्या मंत्र्यांचा बहिष्कार नव्हता तर...
चंद्रशेखर बावनकुळे यांची महत्त्वाच्या राजकीय घडामोडीवर सारवासारव
मुंबई: प्रतिनिधी
शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घातला नव्हता तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या कामात मग्न असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीने ते या बैठकीला अनुपस्थित राहिले, अशा शब्दात आज घडलेल्या मोठ्या राजकीय घडामोडीवर सर्वात करण्याचा प्रयत्न महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
मंत्रिमंडळात शिंदे गटातील अथवा इतर कोणत्याही मंत्री नाराज नाहीत. ते मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने निवडणूक तयारीसाठी बैठकीला अनुपस्थित होते, असा दावा बावनकुळे यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या उमेदवारी अर्जची छाननी करण्याचा दिवस असल्यामुळे सर्व पक्षांचे मंत्री आपण प्रभारी असलेल्या जिल्ह्यात रवाना झाले आहेत. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली आहे, असे बावनकुळे म्हणाले.
महायुतीतील पक्षांनी एकमेकांच्या नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश द्यायचा नाही, हे यापूर्वीच ठरलेले होते. प्रत्यक्षात, कोणत्याही पक्षाने या अटीचे पालन केले नाही. आमच्याकडील काही लोक शिंदे गटात गेले. राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटातले काही नेते आमच्याकडे आले. त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गटातील काही नेतेही आमच्याकडे आले. त्यामुळे एकमेकांमध्ये नाराजी असणे स्वाभाविक आहे, असेही बावनकुळे म्हणावे.
मात्र, नेते आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील पळवा पळवी मुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये आलबेल नसल्याचे दिसून आले आहे. बावनकुळे यांनी देखील हे मान्य केले असून तिन्ही पक्षाचे सर्वोच्च नेते याबाबत योग्य तो निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले आहे. याबाबत समन्वय समितीच्या बैठकीत काय निर्णय घेतला जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

