- राज्य
- काँग्रेसने पुढे केला शरद पवार यांच्यासमोर मैत्रीचा हात
काँग्रेसने पुढे केला शरद पवार यांच्यासमोर मैत्रीचा हात
शरद पवार आणि वर्षा गायकवाड यांच्यात युती संदर्भात प्राथमिक चर्चा
मुंबई: प्रतिनिधी
आगामी महापालिका निवडणुकीत युती करण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी या संदर्भात चर्चा केली.
ही चर्चा प्राथमिक स्वरूपाची असून पुढील आठवड्यात पुन्हा एकदा बैठक आयोजित करून अधिक विस्ताराने चर्चा करण्यात येईल, असे वर्षा गायकवाड यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. महाराष्ट्र आणि मुंबईच्या हितासाठी तसेच संविधानात्मक चौकटीत राहूनच निर्णय प्रक्रिया राबविण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केली.
विशेष म्हणजे यापूर्वी वर्षा गायकवाड यांनीच मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र त्यांनीच शरदचंद्र पवार पक्षासमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. त्याचवेळी कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा दडपशाही करणारा आणि कायदा हातात घेणारा पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेस कधीही त्यांच्याबरोबर जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

.jpg)