- राज्य
- मनसेची एकशे पंचवीस जागा लढवण्यासाठी जय्यत तयारी
मनसेची एकशे पंचवीस जागा लढवण्यासाठी जय्यत तयारी
आरक्षण जाहीर झाल्यानंतर शिवसेना, मनसे करणार जागावाटपाची चर्चा
मुंबई: प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपली ताकद आजमावायला सुरुवात केली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 227 पैकी 125 जागांवर उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीने जय्यत तयारी केली आहे.
परळ, लालबाग, दादर, माहीम, भांडुप, जोगेश्वरी अशा मराठी बहुल भागातील प्रभागांमध्ये मनसेची विशेष ताकद असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. शिवसेना ठाकरे गटाबरोबर युती करून जागावाटपाची चर्चा करण्यापूर्वी मनसेच्या वतीने मुंबईतील सर्व 227 प्रभागात पाहणी करून 125 जागांचा समावेश असलेली यादी तयार केली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभागाच आरक्षणाची सोडत अकरा तारखेला काढली जाणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने सर्वच पक्षांच्या युती आघाडी आणि जागावाटप याबद्दलच्या चर्चांना वेग येणार आहे. ठाकरे गट आणि मनसे यांच्यामध्ये जागा वाटपाचे सूत्र अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, मनसेतील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिथे ज्या पक्षाची ताकद अधिक तिथे त्या पक्षाला उमेदवारी देण्यात येईल, असे प्राथमिक दृष्ट्या निश्चित करण्यात आले आहे.

