- राज्य
- निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारची नवी योजना
निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारची नवी योजना
ब्राह्मण राजपूत आणि आर्य वैश्य समाजातील युवकांसाठी अर्थसाहाय्य
मुंबई: प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर आलेले असताना सरकारने ब्राह्मण राजपूत आणि आर्य वैश्य समाजाच्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना व्यवसाय उभा करण्यासाठी अर्थसहाय्य देणारी योजना अमलात आणली आहे.
राज्य सरकारने ब्राह्मण समाजासाठी परशुराम महामंडळ, राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप महामंडळ आणि आर्य वैश्य समाजासाठी वासवी कन्यका महामंडळाची स्थापना यापूर्वीच केली आहे. या महामंडळाच्या माध्यमातून या तिन्ही समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना उद्योग उभारणीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या कर्जाची परतफेड नियमितपणे व्याजाचा परतावा दिला जाणार आहे.
वास्तविक या तीन समाजांसह अन्य काही समाजांसाठी राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वीच महामंडळ स्थापन केली होती. मात्र, त्यांचे नियमित कामकाज सुरू झालेले नव्हते. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक समोर असताना राज्य सरकारने या महामंडळाच्या मार्फत तरुणांसाठी अर्थसहाय्य योजना अमलात आणल्या आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना तत्कालीन सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना अमलात आणली. त्यामुळे लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मतदान केले. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत या नव्या योजनांचा फायदा होईल, अशी अपेक्षा महायुतीला आहे.

