'... विरोधकांच्या फेक नरेटिव्हला जनतेकडून चोख उत्तर'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
छत्रपती संभासंभाजीनगर: प्रतिनिधी
विरोधकांकडून सातत्याने खोटी कथिते पसरवण्याचे काम सुरू आहे. मात्र, जनता त्याला बळी पडत नाही. उलट जनतेकडून या फेक नरेटिव्हला चोख प्रतिउत्तर दिले जात असल्याचे बिहार विधानसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आले आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
भारतीय जनता पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर येथील नूतन कार्यालयाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते.
विरोधकांकडून, विशेषतः काँग्रेसकडून सातत्याने मतचोरी आणि इतर विषयांवर सातत्याने खोटी कथित पसरवित आहेत. मात्र, त्यांच्याकडे याचे पुरावे मागितले तर ते देण्याची त्यांची तयारी नाही. त्यामुळे जनता त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. काँग्रेस किंवा विरोधी पक्ष जोपर्यंत जनतेत पोहोचून त्यांच्या भावना समजून घेत नाहीत, त्यांच्या हिताची कामे करत नाही तोपर्यंत त्यांची मातीच होत राहणार, हे मी यापूर्वीच बोललो आहे, असे फडणवीस म्हणाले.
भाजपाला मोठे करण्यात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे या नेत्यांचे मोठे योगदान आहे. प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचे कार्यालय असावे, अशी त्यांची इच्छा होती. या कार्यालयाच्या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण व्हावी, लोकांची काम व्हावी, पक्षाचा विस्तार व्हावा, असे पक्षाचे धोरण आहे, हे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीच्या लोकांनी संभाजीनगर महापालिकेवर आठशे कोटीचा बोजा टाकला. त्याबद्दल त्यांना लाजही वाटत नाही. ते पैसे महायुती सरकारने भरले. छत्रपती संभाजी नगरचा पाण्याचा प्रश्न महायुती सरकार सोडवण्याच्या मार्गावर आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

