- राज्य
- 'निवडणूक प्रक्रिया भ्रष्ट मार्गावर, सत्तेचा वापर करून पैशाचे वाटप'
'निवडणूक प्रक्रिया भ्रष्ट मार्गावर, सत्तेचा वापर करून पैशाचे वाटप'
बिहार विधानसभा निकालावर शरद पवार यांची तीव्र प्रतिक्रिया
मुंबई: प्रतिनिधी
सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया भ्रष्ट मार्गावर आणली आहे. सत्ताधारी सत्तेचा वापर करून पैशाचे वाटप करत आहेत आणि निवडणूक आयोग त्याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी बिहार विधानसभा निकाल बाबत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
आता बिहारमध्ये जे घडले आहे तेच महाराष्ट्रात आम्हीही भोगले आहे. बिहारमध्ये निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करून महिलांना दहा हजार रुपये वाटले. निवडणूक आयोगाने त्याकडे लक्ष दिले नाही. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांपूर्वी देखील हेच घडले होते. त्याची फळे आम्ही भोगत आहोत, असे पवार म्हणाले.
निवडणूक प्रक्रिया भ्रष्ट मार्गावर नेण्याच्या या प्रकाराकडे दुर्लक्ष करता येणार नाही. याच्या विरोधात तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. लवकरच संसदेचे अधिवेशन होणार आहे. यावेळी आम्ही सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन याबाबत चर्चा करू आणि हे प्रकार रोखण्यासाठी काय करता येईल, याबाबत ठोस पावले उचलू असेही पवार म्हणाले.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती, आघाडी करण्याबाबत मित्र पक्षांच चर्चा करून स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा, असे आपल्या पक्षाच्या तालुका व जिल्हा पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

