- राज्य
- साधू हत्याकांडातील आरोपीच्याच हाती दिले कमळ
साधू हत्याकांडातील आरोपीच्याच हाती दिले कमळ
काशिनाथ चौधरी यांचा हजारो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश
पालघर: प्रतिनिधी
डहाणू तालुक्यात झालेल्या साधू हत्याकांडातील आरोपी आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते काशिनाथ चौधरी यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत तब्बल चार हजाराहून अधिक कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. साधू हत्याकांडावरून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर कठोर टीका करणाऱ्या भाजपने चौधरी यांना प्रवेश दिल्यानंतर, आता नैतिकता सोडली का, असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे.
कारमधून प्रवास करीत असलेल्या दोन साधू आणि त्यांच्या चालकाची 16 एप्रिल 2020 रोजी जमावाने दगड मारून हत्या केली होती. चौधरी हे त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते. ते पालघर जिल्हा परिषदेचे सदस्यही होते.
साधू हत्याकांडावरून भाजपने त्यावेळी सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीला आणि त्यांच्या सरकारला धारेवर धरले होते. हेच काशिनाथ चौधरी साधू हत्याकांडातील मुख्य आरोपी असल्याचा दावा देखील भाजपनेच केला होता. मात्र, त्याच चौधरी यांना भाजपने कमळ हाती दिले आहे. त्यामुळे तालुक्यात पक्षाची ताकद वाढली असली तरी देखील या प्रवेशावरून केवळ विरोधकांकडूनच नव्हे तर पक्षांतर्गत देखील मोठ्या प्रमाणावर टीकाटिप्पणी होण्याची शक्यता आहे.

