- राज्य
- शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाकडून दिलासा
शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाकडून दिलासा
पिपाणी हे चिन्ह यादीतून वगळण्यास आयोगाची मान्यता
मुंबई: प्रतिनिधी
मुक्त निवडणूक चिन्हांच्या यादीतून पिपाणी हे चिन्ह वगळण्यास मान्यता देऊन निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा दिला आहे. आपल्या निवडणूक चिन्हांशी साधर्म्य असल्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपल्याला मोठा फटका बसल्याचा दावा पक्षाकडून केला जात होता.
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांचे नाव आणि निवडणूक चिन्ह कोणत्या गटाला मिळावी, याची लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या तुतारी वाजवणारा माणूस या निवडणूक चिन्हाशी पिपाणी या चिन्हाचे साधर्म्य असल्यामुळे आपल्याला मिळालेल्या मतात घट झाली, असा पक्षाचा दावा आहे.
मुक्त निवडणूक चिन्हांच्या यादीत शरद चंद्र पवार पक्षाच्या निवडणूक चिन्हाचे नाव तुतारी असे होते. तुतारी आणि पिपाणी यात साम्य आहे. तुतारी या चिन्हाला मिळणारी अनेक मते मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्यामुळे पिपाणी हे निवडणूक चिन्ह घेऊन लढणाऱ्या अपक्ष उमेदवारांना गेली.
अपक्ष उमेदवारांना मिळालेली मते ही आपल्या पक्षाचा उमेदवार जितक्या मताने पराभूत झाला त्यापेक्षा अधिक संख्ये होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आपल्या किमान नऊ उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले, असे पक्षाकडून निवडणूक आयोगाला आकडेवारीच्या आधारे सांगण्यात आले.
या कारणामुळे पिपाणी हे निवडणूक चिन्ह गोठवावे, अशी मागणी पक्षाकडून वारंवार करण्यात आली. निवडणूक आयोगाकडून या मागणीला दीर्घकाळ प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तोंडावर असताना निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत पिपाणी हे चिन्ह कोणालाही वापरता येणार नाही.

