- राज्य
- 'रवींद्र चव्हाण यांच्यामुळे महायुतीत मिठाचा खडा'
'रवींद्र चव्हाण यांच्यामुळे महायुतीत मिठाचा खडा'
एकनाथ शिंदे यांची थेट अमित शहा यांच्याकडे तक्रार
मुंबई: प्रतिनिधी
महायुतीत बंडखोरी करणाऱ्या नेत्यांना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून आर्थिक रसद पुरवली जात आहे. मित्र पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये सामावून घेण्यासाठी पैशाचा वापर केला जात आहे. चव्हाण यांच्यामुळेच महायुतीत मिठाचा खडा पडत आहे, अशी तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.
काल रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली. शहा आणि शिंदे यांची तब्बल पन्नास मिनिटे चर्चा झाली. मित्र पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी घेण्यात येत असलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मित्र पक्षांमध्ये अस्वस्थता आहे, हे शिंदे यांनी अमित शहा यांच्या निदर्शनास आणून दिले.
पक्षाचे या आधीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळात महायुतीमध्ये उत्तम प्रकारे समन्वयाचे वातावरण होते. मात्र रवींद्र चव्हाण यांच्या अतिआक्रमक भूमिकेमुळे मित्र पक्षांचे मनोबल दुबळे होत आहे. त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे, असे शिंदे यांनी यांना सांगितले. याचा फटका आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीला भोगावे लागू शकतो, असेही ते म्हणाले.
वाचाळ नेत्यांबद्दलही तक्रार
सध्या राज्यात महायुतीला मोठ्या प्रमाणावर अनुकूल वातावरण आहे. मात्र, काही वाचाळवीर नेत्यांच्या बेजबाबदार विधानांमुळे महायुतीची एकजूट धोक्यात येत आहे. त्याचप्रमाणे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे आपण त्वरित हस्तक्षेप करून वाचाळवर नेत्यांना आवर घालावा, अशी विनंतीही शिंदे यांनी शहा यांना केली.

