- राज्य
- शिंदे गटाच्या उमेदवाराला ठाकरे गटाचा पाठिंबा
शिंदे गटाच्या उमेदवाराला ठाकरे गटाचा पाठिंबा
उमेदवारी अर्ज दाखल करताना दोन्ही गटांच्या नेत्यांची उपस्थिती
पुणे: प्रतिनिधी
आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत एकमेकांवर आगपाखड करणारे शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट चाकण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना दोन्ही गटांचे नेते उपस्थित होते.
खेड आळंदी चे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या निधनानंतर आलेली ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत त्यांच्या पत्नी मनीषा याच उमेदवार असल्यामुळे राजकारण बाजूला ठेवून आपण त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याचे ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे यांनी माध्यमांना सांगितले. हा समझोता केवळ चाकण नगराध्यक्षपदापुरता मर्यादित आहे. तालुक्यातील राजगुरुनगर आणि आळंदी येथे शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार आहे, असे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्गातील कणकवली नगर परिषदेत देखील शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट विकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, हे निलेश राणे यांनी सुचित केले आहे. आम्ही भाजपबरोबर युतीसाठी सकारात्मक होतो. मात्र, काही जणांना ही युती करायची नव्हती. त्यामुळे आता ज्यांना आमच्याशी युती करायची आहे त्यांच्याशी युती होईल, असे राणे यांनी सांगितले.

3.jpg)