- राज्य
- 'पुढील सहा महिन्यात यशोमती ठाकूर दिसतील भाजपामध्ये'
'पुढील सहा महिन्यात यशोमती ठाकूर दिसतील भाजपामध्ये'
रवी राणा यांचा खळबळजनक दावा
अमरावती: प्रतिनिधी
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर पुढील सहा महिन्यात भारतीय जनता पक्षात आलेल्या दिसतील, असा खळबळजनक दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. यापूर्वी देखील त्यांनी भाजपमध्ये येण्याची तयारी दाखवली होती, असेही ते म्हणाले.
यापूर्वी यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली होती. त्यावेळी आपल्याला तिवसा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळत असेल तर मी भाजपमध्ये येण्यास तयार आहे, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या होत्या. आगामी काळात त्या भाजपामध्ये आल्याशिवाय राहणार नाहीत, असा दावा राणा यांनी केला.
नुकतीच यशोमती ठाकूर यांनी खुद्द मुख्यमंत्र्यांवर कठोर शब्दात टीका केली आहे. फडणवीस यांचे मामेभाऊ चिखलदरा नगरपरिषदेत बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी फडणवीस यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून दडपशाही आणि पैशाचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील, असेही त्या म्हणाल्या. या पार्श्वभूमीवर राणा यांचा हा दावा चर्चांना उधाण आणणारा ठरला आहे.

