- राज्य
- भाजपने फोडले आपल्याच मित्र पक्षाचे नगरसेवक
भाजपने फोडले आपल्याच मित्र पक्षाचे नगरसेवक
कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला धक्का
ठाणे: प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाने खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या माजी आमदारांना फोडून आपल्या पक्षात आणले आहे. या ऑपरेशन लोटसमुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
शिवसेनेचे अत्यंत जुने जाणते नेते वामन म्हात्रे यांचे पुत्र अनमोल म्हात्रे यांच्यासह शिंदे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाबाबत भाजपकडून मोठी गुप्तता पाळण्यात आली. नेमके कोण भाजपमध्ये प्रवेश करणार याचा पत्ता शेवटच्या क्षणापर्यंत कोणालाच लागला नाही.
वामन म्हात्रे हे तब्बल पाच वेळा कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत जिंकले होते. त्यातही चार वेळा ते स्थायी समिती अध्यक्ष होते. महापालिकेच्या कामकाजावर त्यांची चांगलीच पकड होती. त्यांना मानणारा मोठा वर्ग कल्याण डोंबिवली मध्ये आहे. त्यांची पुण्याई पाठीशी असलेल्या अनमोल म्हात्रे यांना भाजपने चतुरपणे गळाला लावले आहे.

