'आगामी निवडणुकीत काका पुतण्या येणार एकत्र'
अजित पवार गटाच्या शहर अध्यक्षांनी केला दावा
पिंपरी: प्रतिनिधी
लवकरच होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार या दोघांचे पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढवतील. याबाबत अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात प्राथमिक चर्चा झाली असून अंतिम निर्णय शरद पवार आणि अजित पवार यांच्या चर्चेनंतर घेतला जाईल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केला. ही माहिती स्वतः अजित पवार यांनीच आपल्याला दिल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे.
राज्यात काही अपवाद वगळता अन्य ठिकाणी महायुतीतील घटक पक्ष महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीतील नेते सांगत असले तरीही आगामी नगरपरिषद नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकीत काका पुतण्यांचे समीकरण जुळणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र येत असल्याची ही चर्चा आहे.
भाजपामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती, आघाडी करण्याचे अधिकार जिल्हा पातळीवर सोपवण्यात आले आहेत. त्याचेच अनुकरण इतर पक्षही करत आहेत. काँग्रेसने ही निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. बार्शी, चंदगड आणि बीड या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या चर्चेनंतर युतीचा अधिकृत निर्णय जाहीर केला जाईल, असे सांगितले जात आहे.

