- राज्य
- 'युती आणि जागावाटपाचे अधिकार जिल्हास्तरावर'
'युती आणि जागावाटपाचे अधिकार जिल्हास्तरावर'
परवापर्यंत चित्र स्पष्ट होणार असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा
छत्रपती संभाजी नगर: प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही स्थानिक पातळीवरील छोटी निवडणूक असून त्यात युती करण्याचे आणि जागा वाटपाचे अधिकार जिल्हास्तरावर देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. स्थानिक पातळीवर होणाऱ्या युती आणि आघाडीचे चित्र परवापर्यंत स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय जनता पक्षाच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी फडणवीस छत्रपती संभाजी नगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महापालिका या निवडणुका स्थानिक स्तरावरच्या असतात. त्यामुळे यातील उमेदवारी आणि युती याबाबत राज्य नेतृत्वाकडून कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत. ते सर्व अधिकार जिल्हास्तरावरील नेतृत्वाला देण्यात आले आहेत. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा स्तरावरील नेते याबाबत निर्णय घेत आहेत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
स्थानिक परिस्थितीचा विचार करून काही ठिकाणी भाजपने मित्र पक्षांची युती केली आहे. काही ठिकाणी एका मित्र पक्षाच्या साथीने तर काही ठिकाणी दोन मित्र पक्षांच्या साथीने निवडणूक लढवली जात आहे. काही जिल्ह्यातील नेत्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व बाबतीत परवापर्यंत चित्र स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

