- राज्य
- 'शिंदे यांच्या मनात नाही भाजप बद्दल नाराजी'
'शिंदे यांच्या मनात नाही भाजप बद्दल नाराजी'
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
मुंबई: प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात भारतीय जनता पक्षाबद्दल कोणतीही नाराजी नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते म्हणून आणि शिंदे यांच्याकडे असलेल्या नगर विकास विभागाशी संबंधित कामासाठी त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असल्याचा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
आपली आणि एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट झाली आहे. त्यांच्या मनात भाजप बद्दल नाराजी नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाशी संपर्क साधने हा आमचा रिवाज आहे. त्यामुळे आघाडीचे नेते म्हणून शिंदे आणि अमित शहा यांची भेट झाली. त्याचप्रमाणे नगर विकास विभागाशी संबंधित केंद्र सरकारकडे समन्वय साधण्याच्या दृष्टीने शिंदे यांनी शहा यांची भेट घेतली, असे बावनकुळे यांनी सांगितले.
मित्र पक्षातील नेत्यांना एकमेकांच्या पक्षात प्रवेश न देण्याचा निर्णय महायुतीच्या समन्वय समितीने घेतला आहे. त्यामुळे या पुढील काळात मित्र पक्षातील कोणालाही महायुतीच्या घटक पक्षांमध्ये प्रवेश दिले जाणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. सध्याच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर आल्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळत नाही ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात. खुद्द माझ्या विधानसभा मतदारसंघातील भाजप नेत्यांनी शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे होत असते. त्यामुळे या मुद्द्यावरून महायुतीमध्ये कोणताही विषमवाद नाही, असेही बावनकुळे म्हणाले.
भाजप मित्र पक्षांमध्ये देखील ऑपरेशन लोटस राबवून त्यांच्या नेत्यांना फोडत आहे, याबद्दल नाराजी व्यक्त करत शिंदे गटाच्या मंत्र्यांनी नुकताच मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घातला होता. या पार्श्वभूमीवर काल रात्री शिंदे यांनी दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घेतली. त्यांची सुमारे तासभर चर्चा झाली. या चर्चेत शिंदे यांनी शहा यांच्याकडे फोडाफोडी बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेषतः भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे महायुतीतील बंडखोरांना आर्थिक ताकद देत असल्याचा आरोप केला, अशी चर्चा आहे. मात्र, बावनकुळे यांनी याचा इन्कार केला आहे.

