- राज्य
- महायुतीतील घटक पक्ष देणार नाहीत परस्परांच्या नेत्यांना प्रवेश
महायुतीतील घटक पक्ष देणार नाहीत परस्परांच्या नेत्यांना प्रवेश
मंत्र्यांच्या बहिष्कार नाट्यनंतर पक्षप्रमुखांचा निर्णय
मुंबई: प्रतिनिधी
महायुतीतील घटक पक्षांनी परस्परांच्या नेते, कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात न घेण्याचा निर्णय महायुतीतील घटक पक्षांच्या प्रमुखांनी घेतला आहे. काल मंत्रालयात घडलेल्या शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या बहिष्कार नाट्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गटातील महत्त्वाच्या मोहोऱ्यांना गळाला लावत असल्याच्या नाराजी वरून काल शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घातला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
या प्रकाराबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आम्ही एकत्र लढवल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. अशावेळी महायुतीतील वातावरण दूषित होऊ नये, यासाठी महायुतीतील घटक पक्षांनी मित्र पक्षांच्या नेत्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक घटक पक्षाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पक्षाच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना मी माझ्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना यासंबंधी सूचना देणार आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले.

