- राज्य
- निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का
निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का
मागाठाणाचे आमदार प्रकाश सुर्वे शिवसेना शिंदे गटात दाखल
मुंबई: प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला एका मागून एक धक्के बसत असून मागाठाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' करून शिंदे गटाचा भगवा खांद्यावर घेतला आहे. महापालिका निवडणुकीत तब्बल 100 जागा लढवण्याची आपली तयारी असल्याचे सुर्वे यांनी सांगितले.
मुंबईत सध्या शिंदे गटाकडे शंभर माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत देखील शिंदे गटाला किमान 100 जागा मिळाव्या, अशी आमची अपेक्षा असल्याचे प्रकाश सुर्वे यांनी सांगितले. मागाठाणे विधानसभा मतदारसंघात महापालिकेचे सात प्रभाग असून ते सर्व आम्ही मागणार आहोत. या प्रभागात आमचे नगरसेवक निवडून येतील आणि मुंबई महापालिकेवर महायुतीचा महापौर असेल, असे दावे ही त्यांनी केले.
ठाकरे गटाला निरोप देताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सुर्वे यांनी टीकेची झोड उठवली. मुख्यमंत्री असताना त्यांनी जनतेचे कोणतेही काम केले नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गोरगरिबांना मदत व्हावी यासाठी एखाद्या कागदावरही ठाकरे यांनी सही करण्याची तसदी घेतली नाही, अशी टीका सुर्वे यांनी केली.

