- राज्य
- ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न
ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न
अहिल्यानगर परिसरात तणावाची परिस्थिती
अहिल्यानगर: प्रतिनिधी
ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके पुण्याहून पाथर्डी येथे एल्गार सभेसाठी जात असताना आरणगाव बाह्यवळण रस्त्यावर हातात काठ्या घेऊन आलेल्या अज्ञात युवकांच्या टोळक्याने त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात प्रा हाके यांच्यासह सर्वजण सुरक्षित असले तरी परिसरात तणावाचे वातावरण आहे.
ओबीसी आरक्षण बचावासाठी पाथर्डी येथे आयोजित केलेल्या सभेला उपस्थित राहण्यासाठी प्रा हाके आपल्या गाडीतून निघाले होते. त्यांना पोलीस बंदोबस्तही देण्यात आला आहे. वाटेत नाश्ता करून पुढे निघाले असता त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.
आपल्याला मागील काही दिवसांपासून धमक्या मिळत असल्याचा दावा प्रा हाके यांनी यापूर्वीच केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाच्या गाडीवरही हल्ला झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी जवळ दैत्य नांदूर येथे होणारी एल्गार सभा होणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.
हल्लेखोर नेमके कोण होते हे अद्याप निष्पन्न झालेले नाही. मात्र, त्याबाबत तातडीने तपास करून हल्लेखोरांना ताब्यात घेतले जाईल, असे अहिल्यानगर ग्रामीण पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.