- राज्य
- 'आपल्यावर हल्ला करणारे पवार कुटुंबाने पोसलेले गुंड'
'आपल्यावर हल्ला करणारे पवार कुटुंबाने पोसलेले गुंड'
प्रा लक्ष्मण हाके यांचा पुन्हा पवारांवर आरोप
अहिल्यानगर: प्रतिनिधी
आपल्यावर हल्ला करणारे हल्लेखोर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाने पोसलेले गुंड आहेत. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि खासदार निलेश लंके यांच्याबरोबरची छायाचित्र उपलब्ध आहेत, असा आरोप ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथे पार पडलेल्या ओबीसी एल्गार सभेला प्रा हाके हे पुण्याकडून जात असताना काल दुपारी आरणगाव बाह्यवळण रस्त्यावर हातात काठ्या घेऊन आलेल्या तरुणांच्या टोळक्याने त्यांच्या गाडीवर हल्ला करून गाडीच्या मागच्या काचा फोडल्या. मात्र, या हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही. या हल्ल्यानंतर प्रा हाके यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.
या लोकांची माझी कोणतीही वैयक्तिक दुश्मनी नाही. मात्र, ते पवारांनी पोसलेले गुंड आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्यावर हल्ला केला. माझ्यावर आत्तापर्यंत सात ते आठ वेळा हल्ले झाले आहेत मात्र त्याबद्दल अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. अशी कारवाई झाली असती तर आज मला संरक्षण देण्याची वेळ आली नसती, असे प्राथे यांनी नमूद केले.
काल पोलीस संरक्षण असतानाही आपल्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांना वर्दीचा धाक राहिलेला नाही. आपण काहीही केले तरी आपले काही वाकडे होऊ शकत नाही, अशी त्यांची खात्री झाली आहे. आंतरजातीय विवाह बद्दल आपण केलेल्या वक्तव्यामुळे हा हल्ला केल्याचे ते सांगत आहेत. मात्र, राजर्षि शाहूमहाराज छत्रपतींनी 100 पेक्षा अधिक आंतरजातीय विवाह लावून दिले आहेत. या लोकांना शाहू महाराजांचे विचार कळण्यास शंभर पिढ्या जाव्या लागतील, असेही प्रा हाके म्हणाले.
या लोकांनी अनेक वर्ष महाराष्ट्र ओरबाडून खाण्याचे काम केले. पाहुण्या रावळ्यांचे राजकारण केले. सत्ता त्यांनीच उपभोगली. सहकारी संस्था त्यांच्याच नावावर केल्या, असे आरोप प्रा हाके यांनी पवार कुटुंबावर केले. राज्यातील ५० ते ६० टक्के ओबीसी समाज आजही मुख्य प्रवाहाच्या बाहेर आहे. सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, असे प्रा हाके यांनी नमूद केले.