'आमच्या चार पिढ्या पवारांनी संपवल्या आणि...'
प्रा. लक्ष्मण हाके यांची खुद्द बारामतीत जाऊन पवार कुटुंबावर टीका
पुणे: प्रतिनिधी
झक मारली आणि आम्ही पवारांना निवडून दिले. पवारांनी आमच्या मागील चार पिढ्या सडवल्या आणि पुढच्या चार पिढ्या शिकू नये म्हणून महाज्योती, वसतिगृहासारख्या लोकोपयोगी उपक्रमांना निधी मिळू देत नाहीत, असा आरोप ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके यांनी खुद्द बारामतीत जाऊन केला.
ओबीसी आरक्षण बचावची भूमिका घेऊन 5 सप्टेंबर रोजी बारामतीत एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. तरीही प्रा हाके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. त्याबद्दल प्रा हाके यांच्यासह 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
याप्रकरणी प्रा लक्ष्मण हाके आणि त्यांच्या इतर कार्यकर्त्यांनी बारामती पोलीस ठाण्यात जाऊन, आम्हाला अटक करा, अशी मागणी केली. पोलिसांनी नोटीस देऊन त्यांची सुटका केली. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेवरूनच आपल्यावर गुन्हे दाखल झाल्याचा आरोप प्रा हाके यांनी केला आहे.
आर्थिक निकषावर आरक्षण दिले जावे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले होते. त्यावर देखील प्रा हाके यांनी टीका केली आहे. सुप्रिया सुळे या उत्कृष्ट नव्हे तर निकृष्ट लोकप्रतिनिधी आहेत, असे ते म्हणाले. हे पवार कुटुंबीय गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या डोक्यावर बसले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.