- राज्य
- ... आता आली त्याचे प्रायश्चित्त करण्याची वेळ
... आता आली त्याचे प्रायश्चित्त करण्याची वेळ
भाजपने लगावला उद्धव ठाकरे यांना टोला
मुंबई: प्रतिनिधी
ज्यावेळी कृती करण्याची आवश्यकता होती त्यावेळी घरात बसून राहिलात. आता त्याचे प्रायश्चित्त करण्याची वेळ आली आहे. दसरा मेळावा रद्द करा आणि त्यासाठी खर्च होणारे लाखो रुपये संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून द्या, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
माझ्या हातात तुम्हाला देण्यासारखे काही नाही. फक्त तुम्हाला धीर द्यायला आलो आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी तीन तासात मराठवाड्यातील तब्बल पाच जिल्ह्यांचा दौरा केला. रिकाम्या हाताने शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. अश्रू पुसण्याचे नाटक केले आणि रिकाम्या हातानेच परतले, अशी खोचक टीका उपाध्ये यांनी ठाकरे यांच्यावर केली आहे.
ते रडगाणे तर 'सामना'तून सुरूच असते की...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात दसरा मेळाव्यामध्ये विचारांचे सोने लुटले जात असे. आता मात्र केवळ मिंधे, गद्दार, माझा पक्ष चोरला हीच टेप वाजणार! नुसता कांगावा आणि थयथयाट... त्यासाठी लाखो रुपये खर्च करून सामान्य शिवसैनिकांना भुर्दंड कशाला? ते रडगाणी तर 'सामना'तून सुरूच असते की..., अशा बोचऱ्या शब्दात उपाध्ये यांनी ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे.