- राज्य
- 'आम्ही त्यांच्या पाठीशी पण त्यांचा प्रपंच पोरासाठी...'
'आम्ही त्यांच्या पाठीशी पण त्यांचा प्रपंच पोरासाठी...'
संतप्त शेतकऱ्यांमुळे सदाभाऊ खोत यांनी दौऱ्यातून घेतला काढता पाय
सोलापूर: प्रतिनिधी
नैसर्गिक आपत्तीने हतबल झालेल्या शेतकऱ्यांचा आपल्याच नेत्यांवरील संताप मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत आहे. आपत्तीच्या वेळी केलेला विलंब आणि आजपर्यंत केलेले दुर्लक्ष यामुळे ग्रामस्थांनी व्यक्त केलेली तीव्र प्रतिक्रिया पाहून शेतकरी नेते आणि भाजप आमदार सदाभाऊ खोत यांना दौऱ्यातून काढता पाय घ्यावा लागला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक 24 रोजी सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली व संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आज आमदार खोत हे संकटग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी आले.
माढा जिल्ह्याच्या उंदरगाव येथे गावकरी त्यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झालेले दिसले. एवढे मोठे संकट येऊन सुद्धा इतके दिवस कुठे होता? या आधीच आमची विचारपूस करायला का आला नाही, असे सवाल ग्रामस्थांनी सदाभाऊंना केले. ग्रामस्थांचे हे रूप बघताच सदाभाऊ दौरा अर्धवट सोडून गाडीत बसून निघून गेले.
यांच्या निवडणुकांच्या वेळी आम्ही आमच्या खिशातून यांच्यासाठी पैसे खर्च केले. सगळ्या गावाने मिळून यांना लाख दीड लाख रुपये दिले. यांनी मात्र यांचा सगळा प्रपंच आपल्या पोरासाठी केला. सत्तेसाठी दलबदलूपणा केला. तरीही सदाभाऊ शेतकरी संघटनेचे म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी राहिलो. मात्र, निवडणुकीपासून आत्ताच्या संकट काळापर्यंत त्यांनी आम्हाला तोंड देखील दाखवले नाही, अशा शब्दात ग्रामस्थांनी सदाभाऊंवरची नाराजी व्यक्त केली.