- राज्य
- 'भाजपप्रमाणेच शेतकऱ्यांचेही संकटमोचक व्हा'
'भाजपप्रमाणेच शेतकऱ्यांचेही संकटमोचक व्हा'
बच्चू कडू यांचा मंत्री गिरीश महाजन यांना टोला
चंद्रपूर: प्रतिनिधी
ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक म्हणून अनेकदा भूमिका बजावली आहे, त्याचप्रमाणे एकदा शेतकऱ्यांचे संकटमोचक व्हा, अशा शब्दात प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी मंत्री गिरीश महाजन यांना टोला लगावला.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार अनेक मंत्री अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. महाजन हे देखील धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यात दौऱ्यावर होते. त्यांना शेतकऱ्यांना भेटण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा उशीर झाला. आधीच या परिसरात अधिकारी नुकसानीचे पंचनामे करत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त आहेत.
या तालुक्यात शेकडो जनावरे वाहून गेली आहेत किंवा मरण पावली आहेत. त्यामुळे शेजाऱ्यांनी महाजन यांची गाडी अडवून नुकसान भरपाईची मागणी केली. यावेळी महाजन यांनी, मी अधिकाऱ्यांना सांगून नुकसान भरपाई देतो, असे सांगितले. त्याचवेळी, आत्ता मी पैसे बरोबर घेऊन आलो नाही, असे विधान केले. त्यावर राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शेतकऱ्यांची मनस्थिती लक्षात घेत महाजन यांनी पुढील गावांचा दौरा आटोपता घेतला आणि ते बार्शी कडे रवाना झाले.
या विधानावरूनच बच्चू कडू यांनी महाजन यांच्यावर टीका केली आहे. आपल्याला चांगले बोलता येत नसेल तर दौरे करूच नका. असंवेदनशील विधाने करून जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नका, असे कडू म्हणाले. महाजन यांच्या या विधानाचा त्यांनी निषेध केला.