- राज्य
- 'आवश्यकता भासल्यास निकष शिथिल करून शेतकऱ्यांना मदत'
'आवश्यकता भासल्यास निकष शिथिल करून शेतकऱ्यांना मदत'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
सोलापूर: प्रतिनिधी
अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या संकटात नियमांचा बागुलबुवा न करता वेळप्रसंगी निकष शिथिल करून बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यासाठी काल दोन हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी माढा येथे भेट देऊन पूरस्थिती आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांबरोबरच ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे, अन्नधान्य व चीजवस्तूंचे नुकसान झाले आहे, अशांना देखील मदत देण्यात येईल. त्यासंबंधीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.
ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, ओला दुष्काळ ही एक तांत्रिक संकल्पना आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्याचे काही निकष आहेत. मात्र, सध्याच्या काळात या तांत्रिक बाबींपेक्षा आपतग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे महत्त्वाचे आहे. ओला दुष्काळ जाहीर झाल्यास ज्या प्रकारची मदत करणे शक्य होईल त्या सर्व बाबींची मदत त्यापूर्वीच देण्याचा आपला प्रयत्न आहे, असा दावा देखील मुख्यमंत्र्यांनी केला.
अनेक ठिकाणी धरणातून अचानक अनियंत्रित विसर्ग करावा लागल्यामुळे नुकसान झाले आहे. ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे नियंत्रित स्वरूपात पाणी सोडणे शक्य झाले नाही. त्यातही याबाबत कोणाकडून चूक झाली असेल तर त्याची चौकशी केली जाईल, असेही फडणवीस म्हणाले.
सध्याच्या काळात निसर्गाचे चक्र बदलून गेले आहे. हवामान बदलाचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. आपण सर्वांनीच त्याबाबत जागरूक राहण्याची गरज आहे, असे फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिले. ज्यांच्या शेतातील माती खरडून गेली आहे त्यांना वाढीव मदत देण्यासाठी काही तरतुदी आहेत. त्यानुसार अशा शेतकऱ्यांना निश्चितपणे वाढीव मदत देण्यात येईल. मात्र, सध्या सर्व बाधितांना तातडीची मदत देणे या कामाला प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.