- राज्य
- अनुसूचित जातींच्या आरक्षणातही लागू होणार वर्गीकरण
अनुसूचित जातींच्या आरक्षणातही लागू होणार वर्गीकरण
देवेंद्र फडणवीस यांनी केले सूतोवाच
पुणे: प्रतिनिधी
इतर मागास प्रवर्गाप्रमाणेच अनुसूचित जातींच्या आरक्षणातही वर्गीकरण (क्रिमी लेअर) लागू करण्यात येणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे. आरक्षणाचे लाभ प्रवर्गातील विशिष्ट जातीपुरता मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती आणि प्रभाव वाढवण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इतर मागास प्रवर्गातील पुढारलेल्या घटकांना आरक्षणाचा लाभ दिला जात नाही. या प्रवर्गात क्रिमी लेयर आणि नॉन क्रीमी लेअर असे वर्गीकरण केले जाते. अशाच प्रकारचे वर्गीकरण काही महिन्यात अनुसूचित जातींच्या आरक्षणातही लागू केले जाणार आहे. त्याची पद्धती व निकष निश्चित करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर तो लागू केला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने एका निकाला दरम्यान अनुसूचित जातींना देखील वर्गीकरण लागू करण्याची सूचना केली आहे. अनेक राज्यांमध्ये अनुसूचित जातीतील विशिष्ट जातींना आरक्षणाचा लाभ मिळत आहे आणि अनेक जाती आवश्यकता आणि पात्रता असून देखील आरक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे अनुसूचित जातींना देखील वर्गीकरण लागू करण्याची सूचना न्यायालयाने केली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.