मुंबईच्या वेशीवर कायदा सुव्यवस्था धाब्यावर
सत्ताधारी आमदाराच्या भावानेच घेतली गावगुंडांची धास्ती
ठाणे: प्रतिनिधी
राजधानी मुंबईच्या वेशीवर असलेल्या आणि एक अत्यंत सुसंस्कृत शहर अशी ओळख असलेल्या डोंबिवलीतच कायदा सुव्यवस्था स्थिती धाब्यावर बसल्याचे चित्र आहे. खुद्द सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या भावानेच गावगुंडांची धास्ती घेतल्याने हे चित्र अधोरेखित झाले आहे.
डोंबिवली पश्चिमेला सुरेश मोरे यांचा पेट्रोल पंप आहे. आतापर्यंत दिवस-रात्र सुरू असणारा हा पेट्रोल पंप रात्री अकरानंतर बंद करण्याचा निर्णय मोरे यांनी घेतला आहे. गावगुंड आणि मद्यधुंद लोकांकडून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना होणारी दादागिरी, शिवीगाळ आणि मारहाण यामुळे त्यांचा जीवच धोक्यात येण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणासाठी आपण हा निर्णय घेतला आहे, असा फलकच मोरे यांनी पंपावर लावला आहे.
विशेष म्हणजे सुरेश मोरे हे सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांचे चुलत बंधू आहेत. त्यांना देखील गावगुंडासमोर हात टेकावे लागले आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती अत्यंत बिकट अवस्थेत असल्याची टीका विरोधकांकडून वारंवार केली जाते. या टीकेत तथ्य असल्याचे मागील काही काळात घडलेल्या घटनांवरून स्पष्टपणे दिसून येत आहे.
सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात मागील काही काळापासून सुरू असलेल्य गुन्हेगारीचा धुमाकूळ राज्यासमोर आहेच. आता लेखक, विचारवंत, कलावंत आणि बुद्धिवंतांचे सुसंस्कृत शहर म्हणवणाऱ्या डोंबिवलीची परिस्थिती देखील सर्वांसमोर उघड झाली आहे.