- राज्य
- लघुशंका करण्यास अटकाव केला म्हणून घेतला जीव
लघुशंका करण्यास अटकाव केला म्हणून घेतला जीव
शहरात एका आठवड्यात खुनाच्या तीन घटना
नाशिक: प्रतिनिधी
लघुशंका करण्यास अटकाव केला या क्षुल्लक कारणामुळे धारदार शस्त्राने वार करून जीव घेतल्याची घटना मुंबई आग्रा महामार्गावरील वडाळा नाका येथे घडली आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, शहरात एका आठवड्यात खुनाच्या तीन घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भयाचे वातावरण आहे.
बंडू गांगुर्डे हा 35 वर्षीय मजूर वडाळा नाका येथील उड्डाणपुलाच्या खाली वास्तव्याला होता. त्या ठिकाणी जयेश रायबहादुर हा लघुशंका करण्यासाठी आला. बंडू याने त्याला या ठिकाणी लघुशका करू नको, असे सांगत अटकाव केला. त्यावेळी जयेश यांनी धारदार चाकू काढून बंडूच्या छाती आणि पोटावर वार केले.
गंभीर जखमी असलेल्या बंडूला त्याच्या पत्नीने रिक्षातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी बंडूचा मृत्यू झाला. मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयेश रायबहादूर हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
यापूर्वी श्रमिक नगर येथे दहा-पंधरा जणांच्या जमावाने कंपनीत काम करणाऱ्या एका कामगारावर किरकोळ वादातून धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला होता. दुसऱ्या एका घटनेत इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुना वाद उकरून काढून एका युवकाचा खून करण्यात आला. त्या पाठोपाठ केवळ एका आठवड्याच्या कालावधीत खुनाची ही तिसरी घटना घडली आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर कायदा आणि पोलिसांचा वचक राहिला आहे काय, असा सवाल केला जात आहे.