- राज्य
- लाडक्या बहिणींची संख्या अधिक घटणार
लाडक्या बहिणींची संख्या अधिक घटणार
पती अथवा पित्याच्या उत्पन्नाची होणार पडताळणी
मुंबई: प्रतिनिधी
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांबरोबरच पती अथवा पिता यांची देखील ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पती किंवा पित्याचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक असल्यास संबंधित महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीची संख्या घटण्याची चिन्ह आहेत.
लाडकी बहीण योजनेत पात्र ठरण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. या उत्पन्नाची पडताळणी करण्यासाठी अर्जदार महिला विवाहित असल्यास पतीने व अविवाहित असल्यास पित्याने इ केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याद्वारे पति अथवा पित्याच्या उत्पन्नाची पडताळणी करून महिलेची पात्रता निश्चित केली जाणार आहे.
ओटीपीची अडचण होणार दूर
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी करताना अनेक महिलांना महिला व बालविकास विभागाने विकसित केलेल्या पोर्टलवर ओटीपी मिळणार अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या अडचणींची गांभीर्याने दखल घेतली असून त्या दूर करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच महिलांना निर्वेधपणे तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करता येईल, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.