- राज्य
- ड्रग माफियांच्या आठ ठिकाणांवर ईडीची धाड
ड्रग माफियांच्या आठ ठिकाणांवर ईडीची धाड
अमली पदार्थ विक्रीतून मिळालेल्या पैशाचा मनी लॉन्ड्रीग साठी वापर
मुंबई: प्रतिनिधी
ड्रग माफियांशी संबंधित डोंगरी परिसरातील आठ ठिकाणांवर आज पहाटेपासून सक्तवसुली संचालनालयाच्या पथकांनी धाडी घातल्या. अमली पदार्थ विक्रीतून मिळालेले पैसे बेकायदेशीर सावकारी आणि अन्य अवैध आर्थिक व्यवहारासाठी वापरण्यात आल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
फैजल शेख आणि अल्फिया शेख या अमली पदार्थ विक्री करणाऱ्या गुन्हेगारांशी संबंधित ठिकाणांवर धाडी घालण्यात आल्या. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित असलेला सलीम डोला हा आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ गुन्हेगारीतील मोठा गुंड आहे. सध्या तो भारताबाहेर असून फैजल शेख आणि अल्फिया शेख हे मुंबईत त्याच्यासाठी काम करतात.
फैजल शेख आणि अल्फिया शेख यांच्याकडून प्रामुख्याने एमडी या महाग अमली पदार्थाची विक्री केली जाते. या विक्रीतून त्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसा मिळवला असून तो अवैध व्यवहारांसाठी वापरला जात असल्याचा ईडीचा संशय आहे. त्यावरून डोला याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अन्य काही गुन्ह्यातही पोलिसांना तो हवा आहे. त्याला भारतात आणण्याचा मुंबई पोलीस, इडी व अन्य तपास यंत्रणांचा प्रयत्न आहे. डोंगरी परिसरात घालण्यात आलेल्या धाडी हा त्याची आर्थिक नाकाबंदी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.