- राज्य
- 'क्रिकेट सामन्याची तयारी करण्यापेक्षा मदत कार्याचा आढावा घ्या'
'क्रिकेट सामन्याची तयारी करण्यापेक्षा मदत कार्याचा आढावा घ्या'
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारला धरले धारेवर
मुंबई: प्रतिनिधी
अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीने मोठा विनाश ओढवून सुद्धा अजून पाऊस सुरूच आहे. लोक संकटात आहेत आणि सरकार क्रिकेटच्या सामन्याची तयारी करण्यात मग्न आहे. त्यापेक्षा पूरग्रस्त भागात जा आणि मदत कार्याचा आढावा घ्या, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरले.
पालकमंत्री आहेत कुठे?
मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बीड अहिल्यानगर मध्ये अजूनही पाऊस सुरू आहे. बाधित जनतेला मदतीची गरज आहे. तुम्ही गम बूट घालून चार तास तिकडे फिरून आलात. जनतेला आवश्यकता असताना तिथले पालकमंत्री आहेत कुठे, असा सवाल राऊत यांनी केला.
या पालकमंत्र्यांना बडतर्फ करा
धाराशिवचे पालकमंत्री एकदाच दोन टेम्पो घेऊन गेले. टेम्पोवर फोटो झळकावत गेले. त्यानंतर पुन्हा तिकडे फिरकले नाहीत. जिल्हा संकटात असताना त्यांचे मुंबईत काय काम आहे? अशा मंत्र्यांना तातडीने बडतर्फ करा, अशी मागणी ही राऊत यांनी केली. पालकमंत्र्यांचे हे वागणे हा सामाजिक आणि राजकीय गुन्हा आहे. हे वागणे अमानुष आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी करणार काय?
सत्ता तुमच्या हातात आहे. तिजोरी तुमच्याकडे आहे. अशावेळी संकटात उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला उभा करण्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहे, तुम्ही काय करणार आहात ते आम्हाला सांगा. तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केले, असे अजागळासारखे प्रश्न आम्हालाच विचारू नका. तुम्ही काय मदत केली आणि ती कोणापर्यंत पोचली ते आम्हाला दाखवा, असेही राऊत यांनी सरकारला सुनावले.