- राज्य
- 'सिंधुदुर्ग बँक कर्ज घोटाळा प्रकरणात नितेश राणे सूत्रधार'
'सिंधुदुर्ग बँक कर्ज घोटाळा प्रकरणात नितेश राणे सूत्रधार'
शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार राजन तेली यांचा आरोप
सावंतवाडी: प्रतिनिधी
सिंधुदुर्ग बँकेत झालेल्या कोट्यावधींच्या कर्ज घोटाळा प्रकरणाचे सूत्रधार मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे हे असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी आमदार राजन तेली यांनी केला आहे.
याच घोटाळ्यात बँकेचे व्यवस्थापक विश्वनाथ डोरलेकर यांनी राजन तेली आणि अन्य सात जणांच्या विरोधात बँक सुरक्षा आणि फसवणूक विभागाकडे तक्रार केली आहे. या आरोपापासून बचाव करण्यासाठी राजन तेली यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून शिंदे गटात प्रवेश केल्याचे सांगितले जाते.
राणे हे बँकेचे संचालक असून ते अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर दबाव आणून बेकायदेशीरपणे कर्ज वितरण करायला लावतात. या संदर्भात स्थानिक पोलीस, सहकार निबंधक आणि नाबार्ड यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही, असा आरोप तेली यांनी केला.
राणे यांच्या दबावामुळे रॉकस्टारला पात्रता नसताना एकदा साडेसहा कोटी नंतर दहा कोटी रुपये दिले. केवळ वीस हजार रुपये मासिक मानधन असलेल्या स्वीय सहायकाला सात कोटी रुपयांचे कर्ज दिले. अशा प्रकारे कोट्यावधी रुपयांचे कर्ज वाटप बेकायदेशीरपणे करण्यात आले आहे. याबद्दल आपण तक्रारी केल्यामुळे आपल्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात शासनाने हस्तक्षेप करणे आवश्यक आहे, असे म्हणाले.