- राज्य
- 'अंमली पदार्थ तस्करीला राजाश्रय मिळत असल्याचे पाहून... '
'अंमली पदार्थ तस्करीला राजाश्रय मिळत असल्याचे पाहून... '
पक्षप्रवेशा संदर्भात सुप्रिया सुळे यांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र
मुंबई: प्रतिनिधी
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने तुळजापूर येथे झालेल्या कार्यक्रमात अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित असलेल्या काही जणांना पक्षात प्रवेश दिल्याचा आक्षेप घेणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. अमली पदार्थ तस्करीशी संबंधित लोकांना राजाश्रय मिळत असल्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक पक्षाला आपला जनाधार वाढविण्याचा अधिकार आहे. मात्र, ते करताना समाजविघातक बाबींना खतपाणी घातले जाऊ नये, याबाबतीत आपणही सहमत असाल, अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.
पक्षप्रवेशाचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला.. त्यात समाजविघातक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पक्षात प्रवेश देण्यात आला याचे सखेद आश्चर्य वाटते, असेही सुप्रिया सुळे यांनी पत्रात नमूद केले आहे.
मुख्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडताना कार्यबाहुल्यामुळे आपल्या पक्षात गुन्हेगारांना प्रवेश दिला जात असल्याची बाब आपल्या निदर्शनास आली नसावी अथवा पक्षात प्रवेश दिला जात असलेल्या लोकांची पार्श्वभूमी आपल्या निदर्शनास आणून दिली गेली नसावी. तरी देखील समाज हिताच्या दृष्टीने आपण याबाबतीत लक्ष घालावे, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केले आहे.

