- राज्य
- लेकरांना सावरण्यासाठी धावली पंढरीची विठाई
लेकरांना सावरण्यासाठी धावली पंढरीची विठाई
विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समिती पूरग्रस्तांसाठी देणार एक कोटीचे सहाय्य
सोलापूर: प्रतिनिधी
राज्यावर अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचे संकट आले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागांना पुराने वेढले आहे. या संकटाच्या काळात विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीच्या वतीने पूरग्रस्तांसाठी लाखोंच्या संख्येने जेवणाची पाकिटे व लाडूचा महाप्रसाद वितरित करण्यात आला. पूरस्थितीने अधिक बिकट स्वरूप घेतल्यानंतर पूरग्रस्तांची गरज ओळखून महावस्त्राचे वाटपही करण्यात येत आहे.
याशिवाय राज्यभरातील संकटात सापडलेल्या नागरिकांना, विशेषतः पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी राज्य सरकारला एक कोटी रुपये देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. राज्यातील सर्वच दिवसनी संकटाच्या काळात पूरग्रस्त नागरिकांना व शेतकऱ्यांना उभारी देऊन पुन्हा उभे करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या देवस्थानांमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समिती आघाडीवर आहे.